भारतातील बेरोजगारी | Unemployment in India
This Article Contains
Toggleभारतातील बेरोजगारीस व्यापक अर्थाने बेकारी म्हणतात.
प्रा. पिगू: ‘रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या परंतु रोजगार न मिळालेल्या व्यक्तीस बेकार किंवा बेरोजगार म्हणावे.’
देशातील 15 ते 59 वयोगटातील व्यक्तींची प्रचलित वेतनदारावर काम करण्याची इच्छा व पात्रता असूनदेखील त्यांना प्रत्यक्षात काम न मिळण्याची स्थिती म्हणजे बेकारी होय.
ऐच्छिक बेकारी (Optional Unemployment): ऐच्छिक बेकारी ही व्यक्तीच्या निष्क्रियतेचा व आळसाचा परिणाम आहे.
उदा. ऐषारामी जीवन जगणाऱ्या श्रीमंतांना जसे काम करण्याची इच्छा नसते, तसेच भिकारी, जुगारी व्यक्तींना हलकेसलके काम न करता मिळकतीची अपेक्षा असते. ‘खाईन तर तुपाशी’ वृत्तीच्या लोकांमध्ये देखील ही बेकारी आढळते. तात्पर्य, व्यक्तीची काम करण्याची पात्रता असते, परंतु तिची काम करण्याची इच्छा नसते, तेव्हा ऐच्छिक बेकारी निपजते.
अनैच्छिक बेकारी (Involuntary Unemployment): ऐच्छिक बेकारीच्या अगदी उलट असा हा प्रकार दृश्य किंवा उघड बेकारी म्हणून ओळखला जातो. व्यक्तीची काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही अपेक्षित काम मिळत नाही, तेव्हा अनैच्छिक बेकारी उद्भवते. श्रमाचा अतिरिक्त पुरवठा असूनदेखील त्या तुलनेत श्रमिकांची मागणी कमी असल्यास अनैच्छिक बेकारी उद्भवते.
न्यून किंवा अर्धबेकारी (Low or Semi-Unemployed): व्यक्तीची उच्चं पातळीवर काम करण्याची क्षमता व योग्यता असूनदेखील तुलनेने कमी पातळीचे काम करावे लागत असेल तेव्हा निर्माण होणारी बेकारी ही न्यून किंवा अर्ध बेकारी होय.
उदा. प्राध्यापकाचे काम करण्याची योग्यता असलेल्या उच्चशिक्षित व्यक्तीस लिपिकाचे काम करावे लागणे ही अर्धबेकारी होय.
थोडक्यात, अर्धबेकारीच्या स्थितीत व्यक्तीची काम करण्याची क्षमता व योग्यता पूर्णपणे वापरली जात नाही.
पूर्ण रोजगार: देशातील उत्पादन कार्यात सहभागी होणाऱ्या भूमी, श्रम, भांडवल या उत्पादक साधनांचा परिपूर्ण वापर करून घेऊन प्रचलित वेतनदरावर रोजगार मिळण्याची स्थिती म्हणजे पूर्ण रोजगार होय.
भारतातील बेकारीचे मोजमाप: राष्ट्रीय नमुना पाहणी संस्थेने (नॅशनल सॅम्पल सर्वे) भारतातील बेकारी मोजण्यासाठी खालीलप्रमाणे तीन मापे निश्चित केली आहेत.
1) दैनिक स्थिती बेकारी: काम करण्याची पात्रता व इच्छा असणाऱ्या व्यक्तीस आठवड्यातील एक किंवा काही दिवस रोजगार न मिळणे.
2) साप्ताहिक स्थिती बेकारी: काम करण्याची पात्रता व इच्छा असणाऱ्या व्यक्तीस आठवड्यात एक तासाचादेखील रोजगार न मिळणे.
3) कायम बेकारी/खुली बेकारी (सामान्य स्थिती): काम करण्याची इच्छा व पात्रता असलेल्या तसेच आकस्मिक रोजगार न स्वीकारलेल्या ज्या व्यक्ती संपूर्ण वर्षभर रोजगारापासून वंचित आहेत, अशा व्यक्तींची बेकारी म्हणजे कायम किंवा खुली बेकारी स्थिती.
भारतातील बेकारीचे वास्तव
- रिझर्व्ह बँकेच्या 1969 च्या अहवालानुसार 1951 मध्ये भारतातील बेकारांची संख्या 33 लाख इतकी होती.
- भगवती समितीच्या अहवालानुसार 1971 मध्ये भारतात 1 कोटी 87 लाख लोक बेकार होते.
- नियोजन आयोगाच्या अहवालानुसार 1978 मध्ये भारतात 2 कोटी लोक बेकार होते.
- आठव्या पंचवार्षिक योजनेच्या प्रारंभी (1992) भारतात 2 कोटी 80 लाख लोक बेकार होते.
- दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या प्रारंभी 2003 अखेर भारतात 4 कोटी 13 लाख लोक बेकार होते.
- 2004-05 मध्ये ग्रामीण व शहरी भागातील अनुक्रमे 8.28% लोक बेकार होते.
- राष्ट्रीय नमुना पाहणी संस्थेच्या 2011-12 मधील अहवालानुसार भारतात 1 कोटी 8 लाख बेरोजगार होते.
भारतातील बेकारीचे प्रकार | Types of Unemployment in India
1) ग्रामीण बेकारी
- i) हंगामी बेकारी
- ii) प्रच्छन्न (छुपी) बेकारी
- iii) नियमित बेकारी
2) शहरी बेकारी
- i) तांत्रिक बेकारी
- ii) संघर्षात्मक बेकारी
- iii) सुशिक्षितांची बेकारी
3) चक्रीय बेकारी
4) संरचनात्मक बेकारी
1) ग्रामीण बेकारी (Rural Unemployment) : ग्रामीण भागातील बेकारीचे खालील उपप्रकार पडतात.
i) हंगामी बेकारी (Seasonal Unemployment): याला मोसमी बेकारी असेही म्हणतात.
भारतातील शेती ही पावसावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यातील चार-पाच महिनेच भरपूर काम असते. उर्वरित काळात हे शेतकरी बेकार राहत असल्याने या बेकारीस हंगामी किंवा मोसमी बेकारी म्हणतात.
ग्रामीण भागातील हंगामी बेकारीचे प्रमाण प्रत्येक खेड्यानुसार व प्रत्येक व्यक्तिगणिक तेथील शेतीचे धरणक्षेत्र, सिंचनाच्या सोयी, पीक पद्धती, उत्पादन तंत्र यांच्या संदर्भानुसार वेगवेगळे असते.
ii) प्रच्छन्न किंवा छुपी बेकारी (Disguised or Hidden Unemployment): यालाच अर्थ बेकारी किंवा आवृत्त बेकारी असेही म्हणतात.
विकसनशील व विकसित देशात छुपी बेकारी ही मूलभूत समस्या आहे.
एखाद्या कामाच्या ठिकाणी जितके श्रमिक आवश्यक आहेत, तेथे आवश्यकतेपेक्षा अधिक श्रमिक काम करत असतील, तर हे अतिरिक्त श्रमिक अर्धबेकार किंवा छुपे बेकार असतात.
येथे अतिरिक्त श्रमिकांची सीमांत उत्पादकता मुळीच नसते किंवा शून्य असते.
उदा. खेड्यातील एका कुटुंबात चार भाऊ आहेत. मात्र त्यांच्याकडील जमीन एका भावाने शेती कारण्याइतकीच असेल व चारही भाऊ या शेतीत काम करत असतील तर चौघांपैकी तिघेजण छुपे किंवा अर्ध-बेकार राहतील.
ii) नियमित किंवा कायम बेकारी (Regular or Permanent Unemployment): एखाद्या खेड्यामध्ये मर्यादित जमीन धारणा क्षेत्रात तुलनेने जास्त लोकसंख्या असेल, तर तेथील बहुतांश मजुरांना काम करण्याची इच्छा असूनसुद्धा वर्षभर काम मिळत नाही. बेकारीच्या या स्थितीस नियमित किंवा कायम बेकारी म्हणतात.
खेड्यातील जास्त लोकसंख्या व त्या तुलनेत मर्यादित जमीन, पडीक व डोंगराळ जमीन, सिंचनाच्या अपुऱ्या सोयी, उत्पादन तंत्रांची उणीव हे घटक नियमित बेकारीस कारणीभूत ठरतात.
2) शहरी किंवा नागरी बेकारी (Urban or Civil Unemployment): शहरी बेकारीचे खालीलप्रमाणे उपप्रकार पडतात.
i) तांत्रिक बेकारी (Technical Unemployment): शहरी भागात उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्यामुळे तांत्रिक बेकारी उद्भवते.
कारखान्यांमधून ‘CNC मशीन’ सारख्या यंत्रामुळे पूर्वी आठ-दहा कामगार जे काम करत होते, तेच काम एक व्यक्ती करू शकते. त्यामुळे उर्वरित कामगारांना कामावरून कमी केले जाते.
संगणकीकरणामुळे देखील तांत्रिक बेकरीत झालेली वाढ.
ii) संघर्षात्मक किंवा घर्षणात्मक बेकारी (Struggling or Frictional Unemployment): श्रमाची मागणी व श्रमाचा पुरवठा यांमधील संतुलन बिघडल्याने म्हणजेच आर्थिक संघर्षामुळे संघर्षात्मक वा घर्षणात्मक बेकारी उद्भवते.
आर्थिक मंडी, महागाई वाढ, वीज कपात (लोड शेडींग), कच्या मालाचा तुटवडा, यांत्रिक बिघाड, टाळेबंदी इत्यादी कारणांमुळे काही कामगारांना कामावरून कमी केले जाते. अशा कामगारांना दुसरे काम मिळेपर्यंत परिस्थितीशी संघर्ष करत बेकार राहावे लागते.
श्रमाच्या बाजारपेठेचे योग्य संघटन केल्यास संघर्षात्मक बेकारीचे प्रमाण कमी करता येऊ शकते. मात्र तिचे पूर्णपणे उच्चाटन करता येत नाही.
iii) सुशिक्षित बेकारी (Educated Unemployment): याला ‘पांढरपेशी बेकारी’ असेही म्हणतात.
सुशिक्षित असूनही ज्या व्यक्तींना काम मिळत नाही, अशा बेकारी स्थितीस सुशिक्षित बेकारी म्हणतात.
भारतात रोजगार संधींचा अभाव असल्याने अनेक उच्चशिक्षित व्यक्ती सुशिक्षित बेकार आहेत.
उदा. शाळेतील तुकड्या कमी करण्याच्या शासनाच्या धोरणामुळे D.ed, B.ed केलेले अनेक विद्यार्थी शिक्षकाच्या नोकरीअभावी सुशिक्षित बेकार राहतात.
iii) चक्रीय बेकारी (Cyclic Unemployment): अर्थव्यवस्थेत तेजीच्या अवस्थेनंतर येणाऱ्या मंदीच्या काळात मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेकारी म्हणजे चक्रीय बेकारी.
प्रत्येक देशात तेजीनंतर मंदी हे व्यापार चक्र सतत चालू असते. मंदीच्या काळात उत्पादन घातल्यामुळे कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळते. पुन्हा तेजीचा काळ आल्यानंतर बेकारांना काम मिळते. थोडक्यात, तेजी-मंदीवर आधारित व्यवसाय चक्रामुळे निर्माण होणारी बेकारी म्हणजे चक्रीय बेकारी.
iv) संरचनात्मक बेकारी (Structural Unemployment): देशातील अर्थव्यवस्थेत संरचनात्मक व तंत्रज्ञानात्मक बदल झाल्याने निर्माण होणाऱ्या बेकारीस संरचनात्मक बेकारी म्हणतात.
सध्या स्वतःच्या दुचाकी व चारचाकीतून प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या क्षमतेमुळे रिक्षाचालक, टॅक्सिचालक अशा व्यक्तींना संरचनात्मक बेकारीस सामोरे जावे लागते.
भारतातील बेकारीची करणे | Reasons of Unemployment in India
अ) ग्रामीण बेकारीची कारणे
- 1) लोकसंख्येतील वाढ
- 2) जिरायत शेतीचे अधिक्य
- 3) कृषिप्रधान अर्थव्यवस्था
- 4) शेतीमधील जुने तंत्रज्ञान
- 5) हंगामी रोजगार
- 6) शेतजमिनीचे विभाजन व अपखंडन
- 7) एकत्रित कुटुंबपद्धती
- 8) वारसा हक्क कायदा
- 9) भूसुधारण कायद्यांचे अपयश
ब) शहरी बेकारीची करणे
- 1) औद्योगिक व सेवाक्षेत्राचा मर्यादित विकास
- 2) उत्पादन तंत्रात बदल (यांत्रिक उत्पादन)
- 3) मंद आर्थिक विकास
- 4) तेजी-मंदीचे व्यवसाय चक्र
- 5) धंदेवाईक शिक्षणाचा अभाव
- 6) ग्रामीण जनतेचे स्थलांतर
- 7) घुसखोरी
- 8) शासकीय उदासीनता
बेकारीचे दुष्परिणाम | Adverse Effects of Unemployment
आर्थिक परिणाम
- 1) आर्थिक असुरक्षितता
- 2) उत्पन्न वितरणात विषमता
- 3) दारिद्र्यात वाढ
- 4) मानवी संसाधनांचा अपुरा वापर
- 5) राहणीमानात तफावत
- 6) अनुत्पादक लोकसंख्येत वाढ
- 7) आर्थिक विकासात खीळ
सामाजिक परिणाम
- 1) सामाजिक स्थैर्यास धोका
- 2) गुन्हेगारीत वाढ
- 3) सामाजिक अधःपतन
- 4) निष्क्रियतेत वाढ