शब्दांच्या शक्ती

शब्दांच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा असणारे अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात.

याचे तीन प्रकार पडतात.

1) अभिधा 2) व्यंजना 3) लक्षणा

1) अभिधा (वाच्यार्थ)

एखादा शब्द उच्चारल्यावर त्याचा जो रूढ व सरळ समाजमान्य एकच अर्थ निघतो (म्हणजे त्या घटकाशी निगडित) हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दांच्या शक्तीस  अभिधा असे म्हणतात. शब्द उच्चारल्यावर मूळ वस्तू, पदार्थ डोळ्यासमोर येतो.

उदा. मी एक लांडगा पहिला.

(लांडगा म्हणजे एक हिंस्र जंगली प्राणी)

2) व्यंजना (व्यंगार्थ)

मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. या शक्तीद्वारे प्रगट होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ म्हणतात. मूळ अर्थाचा उपयोग दुसऱ्या अर्थानेसुद्धा केला जातो. व्यंग दाखवणे, नावे ठेवणे तसेच व्दिअर्थाने वापरलेले शब्द यात मोडतात. काव्य अधिक प्रभावी होण्यासाठी ही शब्दशक्ती वापरतात.

उदा. आजकाल समाजात माणसांपेक्षा लांडग्यांचाच वावर जास्त.

वरील वाक्यात लांडगा या शब्दाचा केवळ वाच्यार्थ अभिप्रेत नाही, तर समाजातील माणूसपण असणाऱ्या लोकांपेक्षा लबाड लोकच जास्त आहेत. असे सुचवायचे आहे.

3) लक्षणा (लक्षणार्थ)

ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मनात शंका येते, हे कसे शक्य आहे? तेव्हा ती शब्दशक्ती लक्षणा असते.

उदा. आम्ही ज्वारी खातो.

याचा अर्थ आम्ही ज्वारीपासून केलेले पदार्थ खातो. शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याला साजेसा जो दुसरा अर्थ घेतला जातो, त्याला लक्ष्यार्थ म्हणतात.

खालील उदाहरणांद्वारे शब्दांच्या शक्ती लक्षात घेणे शक्य होईल.

1) अभिधा (वाच्यार्थ) - सरळ समाजमान्य अर्थ
मी एक साप पहिला.
आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे.
बाबा जेवायला बसले.
घरात फार जाळ्या झाल्या आहेत.
आम्ही गहू खरेदी केला.
2) व्यंजना (व्यंगार्थ) - दुसऱ्याला नावे ठेवणे
समाजातील असले साप मारलेच पाहिजेत.
भुंकणारे कुत्रे चावत नसतात.
निवडणूक आल्या, की कावळ्याची कावकाव सुरु होते.
समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजे.
घड्याळाने पाचचे ठोके दिले.
लक्षणा (लक्ष्यार्थ) - हे कसे शक्य आहे?
बाबा ताटावर बसले.
घरावरून हत्ती गेला.
आम्ही आजकाल ज्वारी खातो.
सूर्य बुडाला.
मी शेक्सपियर वाचला.
पानिपतवर सव्वा लाख बांगडी फुटली.
Chat with us